मधुर रस – लक्षणे, गुण व कार्ये, वैशिष्ट्य

मधुर रसाची लक्षणे

स्नेहनप्रीणन आल्हादमार्दवैः उपलभ्यते ।

मुखस्थो मधुरश्च आस्यं व्याप्नुवान् लिंपति इव च ।

मधुर रसामुळे शरीरामध्ये स्निग्धता व मृदुत्व निर्माण होते, शरीर व मनाचे प्रीणन होते म्हणजे शरीर व मन प्रसन्न होतात, मुखामध्ये चिकटपणा उत्पन्न होतो.

प्रिय: पिपीलिकादीनाम्…

मधुर रस मुंग्या, माश्या यांना प्रिय असतो.

मधुर रसाचे गुण व कार्ये

आजन्मसात्म्यात् कुरुते धातूनां प्रबलं बलम्

बालवृद्धक्षतक्षीणवर्णकेशेन्द्रियौजसाम् ।

प्रशस्तौ बंहणः कण्ठ्यः स्तन्यसंधानकृद् गुरूः ।

आयुष्य जीवन: स्निग्धः पित्तानिलविषापहः ।।

मधुर रसाचे गुण : मधुर रसाची द्रव्ये गुरू, स्निग्ध व शीतगुणांची असतात.

मधुर रसाची कार्ये: मधुर रस शरीराला सात्म्य असल्याने बाल, वृद्ध, दुर्बल लोकांना हितकर असतो. कारण, तो सप्तधातूंचे पोषण करतो, सातही धातूंच्या सारभागाची म्हणजेच ओजाची वृद्धी करतो.

सातही धातूंची वृद्धी झाल्यामुळे शरीराची उत्तम वाढ (बृंहण) मधुर रसामुळे होते. मधुर रसामुळे रसधातूचे पोषण होऊन रसधातूच्या स्तन्य या उपधातूची निर्मिती योग्य प्रमाणामध्ये होते.

मधुर रस संधानकर असल्याने, धातूंची झीज कमी करणारा आहे. मधुर रस कंठ या अवयवाचे कार्य प्राकृत ठेवतो, म्हणून मधुर रस कण्ठ्य आहे. मधुर रस स्निग्ध, शीत, व स्निग्ध असल्यामुळे वात व पित्तदोषाचे शमन होते, तसेच मधुर रसामुळे विषाचे दुष्परिणाम कमी होतात.

मधुर रसात्मक आहारीय द्रव्ये : गहू, तांदूळ, दूध, तूप, द्राक्षे, आम्र, केळे इत्यादी. मधुर रसात्मक आहारीय द्रव्यांच्या अतिसेवनामुळे कफवृद्धी व मेदवृद्धी होऊन प्रमेह, स्थौल्य, श्वास, कास इत्यादी विकार होतात.

मधुर रसाचे शरीरावर होणारे परिणाम :

  1. मधुर रसामध्ये पृथ्वी व जल महाभूताचे आधिक्य आहे.
  2. मधुर रस कफवृद्धी करून वात व पित्तदोषाचे शमन करतो.
  3. धातुवृद्धी होऊन शरीराचे पोषण होते.
  4. पंचज्ञानेंद्रियांमध्ये टवटवीतपणा (प्रसन्नता) निर्माण होतो.
  5. केसांचे उत्तम पोषण होते.

मधुर रसात्मक आहारीय द्रव्यांचे वैशिष्ट्य

केवळ उसाची साखर घातलेले पदार्थ म्हणजे मधुर रसात्मक पदार्थ नव्हेत, तर ज्या आहारीय द्रव्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे व गर (pulp) जास्त आहे अशी सर्व आहारीय द्रव्ये मधुर रसात्मक असतात.

त्यामुळेच दुधीभोपळा, दोडका या भाज्या खाताना गोड लागत नसल्या, तरी त्यामधील जल व पृथ्वी महाभूतामुळे त्या मधुर रसाप्रमाणे कार्य करतात. द्राक्ष, अंजीर, आंबा या फळांमध्ये जलांश व पार्थिव तत्त्व पाणी व गराच्या स्वरूपात भरपूर प्रमाणामध्ये असल्याने, ही फळे खाताना गोड लागतात.

हे वाचा –

Share