क्रियाशारीराचे महत्त्व – Kriya Sharir

आयुर्वेदशास्त्र माणसाच्या आरोग्याचा विचार करते म्हणजेच माणसाच्या शरीराचा विचार करते. आयुर्वेदशास्त्रानुसार मनुष्यदेह म्हणजे केवळ हातपाय असलेला मनुष्य नाही. मग शरीर म्हणजे काय? शरीराची व्याख्या काय आहे. पंचमहाभूते म्हणजे काय? शरीर शब्दाचे पर्याय आणि क्रियाशारीर विज्ञानाचे महत्त्व या विषयांची माहिती आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत.

शरीर शब्द कसा निर्माण झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी शरीर शब्दाची निरुक्ती काय आहे ते माहीत असणे महत्त्वाचे आहे.

शरीर शब्दाची निरुक्ती (Definition of the term ‘Sharir’)

प्रत्येक क्षणाला झिजत असते ते शरीर होय. शरीर शब्दाच्या निरुक्तीमधून स्पष्ट होणाऱ्या गोष्टी

(१) श्वसनादी कार्यामध्ये शरीर घटकांची सतत झीज होते. (२) आहारातून परत नवीन शरीरघटकांची निर्मिती होते. अशा तऱ्हेने झीज उत्पत्ती झीज हे चक्र शरीरामध्ये सतत चालू असते. म्हणून शरीर प्रत्येक क्षणाला झिजत असते असे सांगितले आहे.

शरीर शब्दाची निरुक्ती ( Definition)

तत्र शरीरं नाम चेतनाधिष्ठानभूतं पंचमहाभूतविकारसमुदायात्मकं समयोगवाही।

चेतना धातू आत्मा ज्यामध्ये प्रवेश करतो, जे पंचमहाभूतांच्या विकारांपासून (त्यांच्या वेगवेगळ्या मिश्रणातून किंवा त्यांच्या रूपांतरामुळे) बनले आहे व जे पांचभौतिक विकारांच्या समयोगाचे वहन करते त्यास शरीर असे म्हणतात.

शरीर व्याख्या : शारीरक्रियेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण
शरीर = आत्मा + पांचभौतिक शरीरघटक + या शरीर घटकांचा समयोग

आत्मा : आत्मा म्हणजेच चेतन तत्त्व. आत्मा म्हणजे जिवंतपणाचे लक्षण आहे. आयुर्वेदशास्त्रानुसार शरीराबरोबर आत्मा शरीरामध्ये असतो तेव्हाच यांच्या समूहाला शरीर ही संज्ञा प्राप्त होते. शरीरामध्ये आत्मा हे तत्त्व महत्त्वाचे आहे कारण

(१) श्वसन, पचन, सर्व हालचालींचे कारण आत्मा आहे. (२) मनुष्यास सुख, दुःख, द्वेष इत्यादी भावना आत्म्याच्या अस्तित्वामुळेच असतात. (३) आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो म्हणजेच मृत्यू होतो तेव्हा मागे फक्त सर्व अवयवयुक्त चैतन्यरहित जड शरीर शिक्षक राहते. (४) मृत शरीराच्या ठिकाणी श्वसन, सुख, दुःख ही लक्षणे दिसत नाहीत. (५) आरोग्य टिकवायचे असते ते आत्मा असलेल्या जिवंत शरीराचेच. (६) चिकित्सासुद्धा जिवंत शरीरावरच करणे शक्य असते.

आत्मायुक्त पांचभौतिक शरीरावरच शरीराची प्राकृत कार्ये शिकता येतात.

  • जीवन = पांचभौतिक शरीर + आत्मा
  • मृत्यू = केवळ पांचभौतिक शरीर

पंचमहाभूतविकार समुदाय

सर्व द्रव्यं पांचभौतिकम् अस्मिन अर्थे

आयुर्वेदशास्त्रानुसार सर्व द्रव्ये पंचमहाभूतांपासून बनलेली आहेत. मनुष्याचे शरीरदेखील पंचमहाभूतांपासून निर्माण झाले असल्याने शरीराला पंचमहाभूत विकारांचा समुदाय म्हटले आहे.

पंचमहाभूते

महाभूत या शब्दामधील भूत या शब्दाचा अर्थ अस्तित्व असा होतो व ज्या घटकांचे अस्तित्व सृष्टीमधील सर्व सजीव व निर्जीव गोष्टींमध्ये असते त्या घटकांना महाभूत असे म्हणतात.

सूटमधील सर्व सजीवांना व निर्जीवांना व्यापून असणारे घटक पाच आहेत. ज्या पाच घटकांचे अस्तित्व सर्वत्र आहे त्यांना पंचमहाभूते म्हणतात.

पंचमहाभूते : आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी

विकार म्हणजे काय ?

१. विकार म्हणजे बदल. शरीर जरी पंचमहाभूतांपासूनच बनलेले असले तरी ह्या महाभूतांचे शरीरामधील स्वरूप वेगळे असते. शरीरामध्ये पंचमहाभूतांच्या स्वरूप होणारा बदल म्हणजे विकार.

२. दोष, घातू, मल, सर्व अवयव, इंद्रिये पंचमहाभूतांपासूनच बनलेली आहेत. दोष, घातू, मल, सर्व अवयव, इंद्रिये हे पंचमहाभूतांचे विकार आहेत.

मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व

१. आयुर्वेदाने मन हे शरीरापेक्षा वेगळे स्वतंत्र द्रव्य मानले आहे.

२. सर्व शरीर (body) हे मनाचे स्थान आहे. ३. मनाच्या स्वास्थ्याचा परिणाम शरीरावर होतो.

४. म्हणून मन प्रसन्न असेल, तर शरीर प्रसन्न असते.

उदाहरणार्थं, मनामध्ये रागाची भावना असेल, तर शरीरामध्ये पित्त वाढते. मन उदास असेल, तर भूक लागत नाही. म्हणूनच आनंदी मन स्वस्थ शरीरासाठी आवश्यक आहे.

५. जर शरीरामध्ये विकृती असेल, तर मन अस्वस्थ असते. शरीर व मन परस्परांवर अवलंबून आहेत. त्यामुळेच psychosomatic disorder ही संकल्पना आज अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

६. ज्ञानेंद्रियांना स्वतःचे शब्दस्पर्शादी ज्ञान योग्य प्रकारे ग्रहण करणे आवश्यक आहे. कारण, इंद्रियांचे अयोग, अतियोग, मिथ्यायोग व्याधीला कारणीभूत ठरतात. तसेच ज्ञानेंद्रियांवर आत्मा व मनाचे नियंत्रण असते. म्हणूनच शारीरिक व मानसिक साम्यावस्थेला महत्त्व आहे.

हे वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *