आयुर्वेद हे एक भारतीय वैद्यकशास्त्र असून, अतिशय प्राचीन अशी वैदिक परंपरा आयुर्वेदशास्त्राला लाभलेली आहे. आज एकविसाव्या शतकामध्ये माणसाने प्रगतीचे अत्युच्च शिखर गाठलेले आहे, संगणकाने माणसाच्या आयुष्यात क्रांती केलेली आहे. परंतु माणसाच्या आरोग्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. बदलती जीवनशैली, मानसिक ताणतणावामुळे मनुष्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हरवले आहे. त्यामुळे आयुर्वेदशास्त्र सर्व जगाचे आशास्थान बनले आहे. कारण आयुर्वेद हे एकमेव वैद्यकशास्त्र आहे ज्यामध्ये रोगाआधी माणसाच्या आरोग्याचा विचार केला आहे. आयुर्वेदाचे स्वरूप हे केवळ रोग व त्यावरील औषधे असे नसून, आरोग्य टिकवण्याचा, दीर्घायुष्य प्राप्त करून देण्याचा व व्याधिक्षमत्व (immunity) वाढ विण्याचा उपाय के वळ आयुर्वेदशास्त्रानेच सांगितला आहे.
आयुर्वेद हे एकमेव भारतीय वैद्यकशास्त्र आहे जे केवळ रोगाचा विचार करत नाही, तर व्यक्तीच्या आरोग्याचा विचार प्रथम करते. आयुर्वेदशास्त्रामध्ये आरोग्य टिकविण्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत.
अशा या आयुर्वेदशास्त्राचा पाया म्हणजे प्रथम वर्ष बी.ए. एम.एस.ला असलेला ‘क्रिया शारीर’ हा विषय होय. या विषयामध्ये आपण आयुर्वेदशास्त्राची परिभाषा (terminology) शिकणार आहोत, कारण अॅटम, मॉलिक्यूल, अॅसिड हे शब्द आपण शाळेपासूनच शिकतो, पण आयुर्वेदाची ओळख आपल्याला १२ वी नंतरच एकदम होत असल्यामुळे आयुर्वेदातील, दोष-धातू मल-अग्नी या शब्दांचे अर्थ आपल्याला मुळापासूनच समजून घ्यावे लागतात. शारीरक्रिया पेपर-१ मध्ये आपण आयुर्वेद शब्दाची व्याख्या, शरीर म्हणजे काय, तसेच दोषांची कार्ये, श्वसनक्रिया, पचनक्रिया इत्यादी विषय समजून घेणार आहोत.
प्रस्तुतच्या ‘आयुर्वेद शास्त्राचे वैशिष्ट्य’ या प्रकरणामध्ये आपण आयुर्वेद शब्दाची निरुक्ती, आयु म्हणजे काय? वेद म्हणजे काय? आयु शब्दाचे पर्याय, आयुर्वेद शब्दाची व्याख्या, हितकर व अहितकर आयुष्य म्हणजे काय इत्यादी विषयांची माहिती घेणार आहोत.
आयुर्वेद शब्दाची निरुक्ती
आयुषवेद आयुर्वेद:।
आयुर्वेद या शब्दामधील आयु व वेद या शब्दांचे अर्थ आता आपण बघणार आहोत. आयु – आयुः इति जीवितकालः ।
आयुर्वेद हा शब्द आयु + वेद या दोन शब्दांचा समास आहे. आयुर्वेद आयु: + वेद.
आयु – आयुः इति जीवितकालः।
आयु म्हणजे आयुष्य. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काल म्हणजे आयु.
आयु शब्दाची व्याख्या
शरीरेन्द्रियसत्वात्मसंयोगो धारि जीवितम्।
नित्यगानुबन्ध पर्यायैरायुरुच्यते।।
आयुर्वेदशास्त्राने शरीराबरोबरच आत्मा व मन यांचा संयोग आयुष्यासाठी महत्त्वाचा मानला आहे. कारण आत्मा म्हणजे शरीरामधील चैतन्य आहे. आत्म्यामुळेच मनुष्याला सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न या भावना असतात. शरीरातून आत्मा निघून जाणे यालाच आपण मृत्यू म्हणतो व मृत शरीरामध्ये सुख-दुःखादि भावना नसतात, म्हणूनच आत्मा म्हणचे चैतन्य आहे आणि शरीर, आत्मा, इंद्रिय, मन यांचा संयोग म्हणजेच आयुष्य.
आयु शब्दाचे पर्याय : (१) धारि (२) जीवित (३) नित्यग (४) अनुबंध
१. धारि- धारयति, शरीरं पूतितां गन्तु न ददातीति ।
शरीर घटक टिकवणे, झिजू न देणे हा धारि शब्दाचा अर्थ आहे. झीज जेवढी कमी तेवढे आयुष्य अधिक असते.
२. जीवित जीवयति, प्राणान् धारयति इति ।
चक्रपाणी, च.सू. १/४२ जे प्राणांचे धारण करते, त्यास आयु म्हणतात. मन, आत्मा, त्रिदोष, आणि पंचज्ञानेंद्रियांना आभ्यंतर प्राण म्हणतात; तर अन्न, पाणी, हवा यांना बाह्यप्राण म्हणतात. बाहाप्राणद्रव्ये आभ्यंतरप्राणद्रव्यांचे पोषण करतात व मन, आत्मा, इंद्रिय, शरीर यांचा संयोग टिकवितात म्हणून आयुष्यास जीवित म्हटले आहे.
३. नित्यगनित्यं शरीरस्य क्षणिकत्वेन गच्छतीति
चक्रपाणी टीका च.. १/४२ प्रत्येक क्षणाला शरीरघटक झिजत असल्याने आयुष्य कमी होत असते, म्हणून
आयुष्याला नित्यग असा पर्यायी शब्द आहे.
४. अनुबंध अनुबन्धाति आयुः अपरापरशरीरादि संयोग
रूपतयेत्यनुबन्धः चक्रपाणी, च.सू. १/४२ पर शरीर म्हणजे आत्मा व अपर शरीर म्हणजे पांचभौतिक शरीर इंद्रिय व मन होय. आत्मा (पर शरीर) व अपर शरीर (शरीर, इंद्रिय, मन) यांचा दीर्घकाळ संयोग टेकून राहणे आयुष्यासाठी आवश्यक आहे. आत्मा व शरीराचा दीर्घकाळ अनुबंध (संयोग) असतो म्हणून आयुष्याला अनुबंध पर्यायी शब्द आहे.
वेद : वेद हा शब्द संस्कृत विद् या धातूपासून बनला आहे. विदू म्हणजे ज्ञान किंवा जाणणे. ज्यामुळे आयुष्याचे ज्ञान होते ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद ++ आयुर्वेदशास्त्राला लाभलेली वैदिक परंपरा
आयुर्वेदशास्त्राला वैदिक परंपरा लाभलेली आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद असून, त्यापैकी आयुर्वेद हे अथर्ववेदाचे उपांग आहे.
इह खलु आयुर्वेदो नाम उपांगं अथर्ववेदस्य
आयुर्वेद शब्दाची व्याख्या
हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम्
मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदः स उच्यते ।।
ज्या शास्त्रामध्ये हितकर व सुखकर आयुष्य कोणते आणि अहितकर व दुःखकर
आयुष्य कोणते याबद्दल सांगितले आहे, तसेच ज्या शास्त्रामध्ये आयुष्याचे मान (प्रमाण) सांगितले आहे ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र होय.
आयुर्वेद शब्दाच्या व्याख्येतून पुढील गोष्टी स्पष्ट होतात :
(१) हितकर व सुखकर आयुष्य म्हणजे काय ते या शास्त्रात सांगितले आहे.
(२) मनुष्याचे आयुष्य किती आहे तसेच दीर्घायू होण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजेत हेदेखील या शास्त्रामध्ये सांगितले आहे.
आयुर्वेदाच्या आठ शाखा
१. कायत्विकित्सा | शरीर, मनव अग्नी यांच्या विकृतीने होणाऱ्या सर्व रोगांची चिकित्सा | (Medicine) |
२. बाल | माता व बाल संगोपन | (Pediatrics) |
३. ग्रह | मानसरोग चिकित्सा | (Psychology) |
४. ऊर्ध्वग | कान, नाक, डोळे, घसा, शिर यामधील सर्व रोगांची चिकित्सा | (E N T) |
५. शल्य | बाह्य किंवा अभ्यंतर शल्य काढून टाकण्याची चिकित्सा | (Surgery) |
६. दंष्ट्रा | विषारी प्राण्यांच्या दंशाने उत्पन्न होणाऱ्या रोगांची चिकित्सा | (Toxicology) |
७. जरा (वृद्धावस्था) | रसायन चिकित्सा | (Geriatrics) |
८. वृष | सुप्रजनन चिकित्सा | (Aphrodisiac) |
आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास करण्याची पद्धत
- चरक, सुश्रुत, वाग्भट या मूळ संहितांचा व त्यांच्या टीकांचा अभ्यास करणे.
- मूळ ग्रंथांना अनुसरून लिहिलेल्या पुस्तकांचे अध्ययन करणे.
- रुग्णालयामध्ये रुग्ण परीक्षणाचा अनुभव मिळवणे.
- वैद्यकीय व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणामध्ये इतर प्रचलित वैद्यकशास्त्रांचा अभ्यास करणे. कारण सुश्रुत संहितेमध्येच सांगितले
- आहे की,
एकं शास्त्रमधीयानो न विद्याच्छास्त्रनिश्चयम्।
तस्माद्बहुश्रुत: शास्त्रं विजानीयाच्चिकित्सकः ।।
जो एकाच शास्त्राचे अध्ययन करतो त्याला शास्त्राचे संशयरहित असे ज्ञान होत नाही, म्हणून आयुर्वेदाचे अध्ययन करणाऱ्याने अनेक शास्त्रांचे नित्य श्रवण करावे म्हणजे त्याला आयुर्वेदाचे सखोल ज्ञान होते.
हे वाचा –